जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल   

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात आला आहे. हा पूल भारताच्या अद्वितीय अभियांत्रिकी प्रतिभेचे उदाहरण असून, जम्मू आणि काश्मीरसाठी तो एका नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिलला या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली वंदे भारत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. 
 
पुलाची वैशिष्ट्ये 
   
चिनाब नदीवरील सलाल धरणाजवळ उभारण्यात आलेला जम्मू-श्रीनगर हा रेल्वे प्रकल्प १ हजार ३१५ मीटर लांबीचा आहे. नदी पात्रापासून तो ३५९ मीटर उंच आहे. त्याची मुख्य कमान ४६७ मीटर उंच आहे. हा पूल २६६ किलोमीटर प्रति तास वार्‍याचा वेग सहन करू शकतो. त्याच्या बांधकामात २८ हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला असून, बांधकामात केबल क्रेन प्रणाली वापरण्यात आली आहे. स्फोट तसेच ८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप यासारख्या  संकटाचाही पुलावर परिणाम होणार नाही. पुलाचे आयुष्य १२० वर्षांचे आहे. 
 
३८ बोगदे  
 
या ११९ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी ९६ किलोमीटरचा प्रवास बोगद्याद्वारे होणार आहे. या प्रकल्पात एकूण ३८ बोगदे आहेत. त्यापैकी सर्वात लांब बोगदा सुंबर-अरपिंजला आहे, तो १२.७ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पात एकूण ९२७ पुलांचाही समावेश आहे, त्यांची एकूण लांबी १३ किलोमीटर आहे. यामध्ये चिनाब नदीवर बांधलेल्या पुलाचाही समावेश आहे. चिनाब नदीवरील रेल्वे पूल आणि अंजी खड्ड्यावरील देशातील पहिला केबल पूल यासह अनेक पूलही या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहेत.
 
१२०० सैनिक तैनात
 
रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या रेल्वे पोलिस शाखेचे १२०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनाही सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. जलद कृती दलाची विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
 
कडक सुरक्षा व्यवस्था
 
दहशतवाद्यांच्या कुरापतींमुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा हे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात असून त्यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे रुळांचे संरक्षण करण्यासाठी आणि रेल्वेचे कामकाज सुरक्षित करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
 
कुतुबमीनारच्या पाचपट उंच 
  
या पुलाची उंची आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आणि कुतुबमीनारच्या पाचपट आहे. हा पूल केवळ भौगोलिक अडथळेच नाही तर जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या आकांक्षाही पूर्ण करतो. हा पूल काश्मीर खोर्‍याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा एक स्थिर आणि विश्वासार्ह रेल्वे मार्ग प्रदान करेल.
 
१९९७ मध्ये प्रकल्पाला सुरूवात 
 
काश्मीरला रेल्वेने जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १९९७ मध्ये सुरू झाला होता. २००२ मध्ये या प्रकल्पाला गती मिळाली. मात्र, भूवैज्ञानिक, भौगोलिक आणि हवामानविषयक आव्हानांमुळे तो पूर्ण होण्यास विलंब झाला. केंद्र सरकारने मागील आठ वर्षांत हा पूल बांधून पूर्ण केला.  
 
अटल संकल्पाचे प्रतीक
 
हिमालयाच्या भूगर्भीयदृष्ट्या जटिल आणि अस्थिर भूभागात बांधलेला चिनाब पूल हा भारताचे धैर्य आणि नवनिर्मितीच्या अटल संकल्पाचे प्रतीक आहे. चिनाब पुलामुळे भारतीय अभियांत्रिकीचे जगभर कौतुक होत आहे. हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा एक अतुलनीय नमुना आहे.
 
१४ हजार कोटींचा खर्च 
  
या पुलाच्या बांधकामासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. हा पूल केवळ त्याच्या भव्यतेसाठी आणि उंचीसाठी प्रसिद्ध नाही तर त्याची रचना आणि तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे जगभरात लोकप्रिय आहे.  
 
कोणत्या जिल्ह्यांना जोडणार? 
 
हा प्रकल्प जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियां, बडगाम, श्रीनगर आणि बारामुल्ला या जिल्ह्यांना भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडणार आहे.    

Related Articles